या कादंबरीच्या अखेरीस लेखक म्हणतो, "या प्रकरणाआधी मी लिहिला तो मला नक्की माहीत असलेला या सहा पात्रांचा इतिहास. या प्रकरणात मी लिहिले ते माझ्या कल्पनाविलासाचे फलस्वरूप. मला आज वास्तव जसे दिसते त्याचा हा परिणाम. ...या कादंबरीचा शेवट कसा असावा याबद्दलही मतभिन्नता असू शकतात. नव्हे, त्या असाव्यात अशीच माझी इच्छा आहे. तुम्हाला हा शेवट पटला तर ठीकच, पण पटला नाही तरी मला तेवढेच ठीक वाटेल. काही कादंबऱ्यांना शेवट नसतात, निदान नसावेत." कोण आहेत ही सहा पात्रं? काय आहे त्यांचा इतिहास? या कादंबरीला शेवट नाही म्हणजे काय? मग कादंबरीचे कथानक कुठे संपते? काय सांगायचं आहे लेखकाला या कादंबरीतून? ही कादंबरी 'आधुनिकते'ला समर्पित केली आहे. आधुनिकता म्हणजे नेमकं काय? आणि या आधुनिकतेशी आपले नेमके नाते काय? मकरंद साठे यांची 'गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटी' ही कादंबरी वाचताना या प्रश्नांचा गुंता हळूहळू उलगडत जातो. नेहमीच्या रसाळ शैलीत आणि नावीन्यपूर्ण रचनातंत्राचा अवलंब करीत लिहिलेली ही कादंबरी मानवी जीवनाविषयीचे सखोल भाष्य करते.